सुचना न देताच गाड्या रद्द होत असल्याने प्रवासी संतप्त
भुसावळ- पश्चिम रेल्वे विभागातंर्गत नंदूरबार व दोंडाईचा विभागामध्ये 20 ते 22 जुलै असे तीन दिवस इंटर लॉकींग वर्कसाठी ब्लॉक घेतला जात आहे मात्र रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारे पुर्व सुचना न देता काही गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून रेल्वेच्या सततच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 59013 सुरत-भुसावळ पॅसेजर डाऊन ही गाडी 19 रोजी कोणतीही पूर्व सुचना न देता तसेच 20 रोजी सुरत स्थानकावरून तर गाडी क्रंमाक 59014 भुसावळ – सुरत पॅसेंजर ही गाडी 20 व 21
जुलैदरम्यान रद्द करण्यात आल्याने या गाडीने प्रवास करणारे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून त्यांच्यामध्ये संताप व्यक्त केला जात असल्याने रेल्वे प्रशासनाचे दखल घेण्याची आवश्यकता आहे.
प्रवासी रेल्वे गाड्यांच्या मार्गात केला बदल
गाडी क्रमांक 12655 डाऊन अहमदाबाद-चैन्नई अहमदाबाद वरून सुटणारी नवजीवन एक्सप्रेस ही गाडी 20 व 21 जुलै रोजी वसईरोड मार्गे वळवण्यात आली आहे. गाडी क्रमांक 22947 डाऊन सुरत-भागलपूर ताप्तीगंगा एक्सप्रेस ही 21 रोजी वसई रोड मार्गे वळवण्यात आली. यासह अनेक गाड्या 19 व 20 जुलै रोजी वसईरोड मार्गे वळवण्यात आल्या आहेत मात्र प्रवाशांना कुठल्याही प्रकारे पुर्व सुचना न देता रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून संताप व्यक्त होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने दखल घेणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.