शहापूर (जितेंद्र भानुशाली)। दोन दिवसांपूर्वी नागपूर-दुरांतो एक्स्प्रेसला आसनगाव-वासिंद स्थानकादरम्यान झालेला अपघात आणि यापूर्वीही याच ठिकाणी झालेले अपघात यामुळे कल्याण ते कसारादरम्यान भविष्यात अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या मातीचा ढिगारा खाली आला, तेथूनच कल्याण-कसारा तिसरी लाइन जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेला आणि झालेले पूर्वीचे अपघात पाहता याठिकाणी कोकण रेल्वे मार्गाप्रमाणे लोखंडी जाळ्या किंवा संरक्षक भिंती उभारणे अनिवार्य आहे.
येथील माती भूसभुशीत असल्याने टाकलेला भराव मुसळधार पावसात कितपत तग धरेल, यावर प्रश्नचिन्ह आहेत. दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात, खर्डी व याच ठिकाणी झालेले यापूर्वीचे लहान-मोठे अपघात पाहता कल्याण-कसारा रेल्वे मार्गाला समांतर रस्त्याच्या मागणीला जोर आला आहे.
समांतर रस्ता नसल्याने अनेक अडथळे
तसेच या अपघाताच्या निमित्ताने रेल्वे मार्गाला समांतर रस्ता असणे आवश्यकच आहे हे अधोरेखित होते. कारण ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण डोंगराळ भागात असून, मदत कार्यात समांतर रस्ता नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. कल्याण-कसारा मार्गात टिटवाळा रेल्वेस्थानकाच्या पुढे अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी एखादा अपघात झाल्यास रस्त्यांअभावी मदतकार्यात अडथळे येऊ शकतात. समांतर रस्त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून त्यांच्यावर तत्काळ उपचार करणे सोयीचे होईल.
वेहळोली गेट अपघाताचे ठिकाण
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गावर ज्या ठिकाणी दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला आहे ते वासिंद ते आसनगाव स्थानकांदरम्यानच्या खातिवली व वेहळोली गावांमधील वेहळोली गेटजवळचे ठिकाण या मार्गावरील अपघात स्थळ म्हणून ओळखले जाते. 1999 याच अपघातस्थळी वेहळोली गावातील प्रवासी जखमी झाले होते, तर 2015 लाही याच ठिकाणावर मोठे झाड कोसळल्याने सुदैवाने अपघात होता होता टळला होता. तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यातच याच मार्गावरील खर्डी-आटगाव स्थानकादरम्यान सीएसटीला जाणारी लोकल ट्रेन ट्रँकवरून घसरली होती. त्यावेळी नाशिकच्या दिशेने येणारी एक्स्प्रेस या घसरलेल्या लोकलला धडकल्याने एकाचा मृत्यू, तर अनेक प्रवासी जखमी झाले होते.
चाकरमानी हवालदिल
मंगळवारच्या घटनेनंतर मुंबई-ठाण्यात नोकरी करणार्या प्रवाशांना आपले काम सोडून घरी बसावे लागले आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी शहापूर वा आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा येथून कल्याण किंवा ठाणे येथे जाण्यासाठी कोणत्याही एसटीशिवाय कोणताही पर्याय नाही. पण एसटीचे भाडे, वेळेवर एसटी नसणे यामुळे चाकरमान्यांसह उदरनिर्वाह करणार्या लोकांचा रोजगार बुडाल्याची ओरड होत आहे.