खाद्यपदार्थावर लागणार 5 टक्के जीएसटी
नवी दिल्ली : रेल्वेतील खानपाण आता महागणार असून, रेल्वे प्रवासात अथवा फलाटावर दिल्या जाणार्या खाद्यपदार्थ व पेयांवर यापुढे पाच टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागणार आहे. त्यामुळे मूळ किमतीपेक्षा या वस्तू थोड्या महागणार आहे. अर्थमंत्रालयाने ही माहिती दिली.
अर्थमंत्रालयाचे रेल्वेला पत्र
अर्थमंत्रालयाने या संदर्भात भारतीय रेल्वेला पत्र पाठविले आहे. तसेच, जीएसटी वसुलीबाबत मार्गदर्शक सूचनादेखील जारी केल्या आहेत. रेल्वे प्रवासासह रेल्वे फलाट व रेल्वेच्या आवारात कुठेही खाद्यपदार्थ, पेये अथवा अन्य वस्तूंची विक्री केल्यास त्यावर पाच टक्के अतिरिक्त जीएसटी वसूल करण्याचे निर्देश या पत्राद्वारे रेल्वेला देण्यात आलेले आहेत. भारतीय रेल्वे अथवा रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने परवानाधारक सेवा पुरवठादारांकडून हा जीएसटी वसूल करायचा आहे. पुरवठादारांनी पुरविलेल्या खानपाण सेवेवर टॅक्स क्रेडिटच्या पाच टक्के दराने जीएसटी वसूल केला जाणार आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे. अर्थात, हा कर सेवा पुरवठादार आता प्रवाशांकडून वसूल करणार असल्याने रेल्वेतील खानपाण सेवा महागणार आहे.