रेल्वेतील वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी उपाययोजना

0

भुसावळ। पडक्या भिंती आणि छुप्या मार्गांमुळे रेल्वेत चोरी करुन पळ काढणार्‍या गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे, याला आळा घालण्यासाठी रेल्वे विभागीय व्यवस्थापक रामकरण यादव व अधिकार्‍यांनी मंगळवार 1 रोजी सकाळी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. डीआरएम यादव यांनी सर्व छुपे मार्ग बंद करण्याच्या व भिंतींच्या डागडुजीसह उंची वाढविण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

पडक्या भिंतींचे बांधकाम करण्याच्या सुचना
यामुळे रेल्वे परिसरातून गुन्हेगारांना निसटणे शक्य होणार नाही यासाठी उपाय करण्याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी असे सांगितले. भुसावळ रेल्वे स्थानकातून चोवीस तासात दीडशे प्रवासी गाड्या आणि इतर मालगाड्यांची एकसारखी ये-जा सुरू असते. देशातील मोठे यार्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या भुसावळ रेल्वे परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेल्या काही त्रुटींमुळे गुन्हेगारांचे फावते आणि धावत्या गाडीत हातसफाई करुन संशयित पसार होतात. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी अडचणी येतात. ही बाब हेरुन रेल्वे विभागीय व्यवस्थापक राम करण यादव यांनी आज सकाळी 10 वाजेपासून रेल्वे परिसराची पाहणी करण्यास सुरवात केली. दगडी पुलापासून नागपूर दिशेकडील यार्डापर्यंतचा भाग डीआरएम यादव यांनी पिंजुन काढला. यावेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व्ही. पी. डहाट, सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे, स्थानक व्यवस्थापक आर. के. कुठार, सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही. के. लांजिवार, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांच्यासह यांत्रिकी व स्थापत्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.