रेल्वेतून पडून परप्रांतीय प्रौढाचा मृत्यू

0

जळगाव । धावत्या रेल्वेतून पडून परप्रांतिय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी प्रौढाच्या अंगझडतीत मिळालेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली असून राजकुमार गौरीशंकर शर्मा (48) असे मयताचे नाव आहे. सकाळी मृतदेहास जिल्हा सामान्य रूग्णालयात शवच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी नातेवाईकांना कळवले..
आसोदा रस्त्यावरील रेल्वेगेटजवळच खांबा क्रं. 415/22 दरम्यान, धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी गाठले. पोलिस कर्मचारी अरूण पाटील, शैलेश चव्हाण, ठाकूर, सोनवणे यांनी मृतदेह ताब्यात घेत त्यानंतर पंचनामा केला आणि लागलीच मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णवाहिकेतून पाठविले. त्या अगोदर त्यांनी मयत प्रौढाची अंगझडती घेतली असता त्यांना त्याच्या खिशातून आधार कार्ड व मोबाईल मिळून आला.

आधार कार्डवरून प्रौढाची ओळख पटली व राजकुमार गौरीशंकर शर्मा असे नाव असल्याचे समोर आले व तो अलीगढ येथील असल्याचे समजले. पोलिसांनी मिळालेल्या मोबाईलमधून मयत प्रौढाच्या नातेवाईकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मंबई येथे असलेल्या नातेवाईक दुपारी जळगावसाठी रवाना झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.