भुसावळ : जळगाव रेल्वे स्थानकावरून सुरत पॅसेंजरमध्ये चढताना दोंडाईचा येथील महिला प्रवाशाची पर्स चोरीला गेली होती. या प्रकरणी दोन आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 57 हजार रुपये किंमतीची पोत व काही रोकड जप्त करण्यात आली. आरोपींना 24 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. धोंडूराम लक्ष्मण भोसले (22, रा.सचिन झोपडपट्टी, सुरत, गुजरात) व करंजाबाई लक्ष्मण पवार (25, रा.राजकमल चौक, दसेराा मैदान, अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संशयीत आरोपी 11 रोजी मध्यरात्री जळगाव रेल्वे स्थानकावर फिरताना त्यांना अटक करण्यात आली. 9 मार्च रोजी नीलिमा प्रशांत चौधरी (33, रा.विठ्ठल मंदिर चौक, दोंडाईचा) या पती प्रशांत सुरेश चौधरी यांच्यासह जळगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरून डब्यात चढत असताना चोरट्यांनी त्यांची मंगलपोत व अन्य दागिने तसेच 15 हजारांची रोकड लांबवली होती. आरोपींच्या अटकेनंतर या गुन्ह्याची उकल झाली तर दोन हजारांची रोकड 57 हजार 500 ची अडीच तोळ्याची सोन्याची मंगळपोल जप्त करण्यात आली. ही कारवाई भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र पाटील, महेंद्र पाटील, आरपीएफचे रोशन जमीर खान यांनी संयुक्तरीत्या केली.