जळगाव । शनिवारी मुंबईकडून येणार्या गितांजली एक्स्प्रेसमध्ये एका युवकाला किरकोळ कारणावरून विक्रेत्याकडून बेदम मारहाण झाली. या प्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांत विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळधी येथील रईस नईम देशपांडे हा मुलूंड येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. शनिवारी गितांजली एक्स्प्रेसने तो जळगावकडे येत होता. त्याला ऐनवेळी घरच्यांचे बोलवणे आल्याने तो जनरल बोगीतून प्रवास करीत होता.
नाशिक येथून काही अवैध विक्रेते गाडीत चढले. त्यापैकी एकाने पाचोर्याजवळ रईसच्या खिशाला हातलावून पाकीट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या लक्षात आल्याने रईसनेत्याला हटकले. अवैध विक्रेत्याने पायावर पाय ठेवला म्हणून वाद घातला. त्यानंतर त्याने रईसला बेदम मारहाण केली. त्यावेळी प्रवाशांनी अवैध विक्रेत्याला पकडून ठेवले. रेल्वे भोईटेनगर रेल्वे गेटजवळ थांबल्याने विक्रेत्याने प्रवाशाच्या हाताला झटका देत तेथून तो पसार झाला.