रेल्वेत नोकरीच्या आमिषाने 30 लाखांची फसवणूक

0

भुसावळातील त्रिकुटासह चौघाविरुद्ध गुन्हा ; जिल्ह्यात अनेकांना गंडा घातल्याचा संशय

भुसावळ- रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भुसावळातील त्रिकुटासह जळगावातील एकाने जिल्ह्यातील अनेकांना गंडवल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी शहर पोलिसात 30 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रमोद रामदास अहिरे (मोहित नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी सिद्धेश सुरेश पोतदार, सुरेश राजाराम पोतदार, सुभाष राजाराम पोतदार (जुना साता, घासीलाल हॉटेलसमोर, भुसावळ) व श्रीकृष्ण तारापुरे (जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नोकरीच्या आमिषाने घातला गंडा
तक्रारदार प्रमोद अहिरे यांचा भाचा तुषार भास्कर चौधरी व पुतण्या सचिन प्रकाश अहिरे (नाशिक) यांचा शिक्षण घेताना आरोपी सिद्धेशसोबत परीचय असल्याने त्याने रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून नोकरीला लागल्याचे सांगत विश्‍वास संपादन करून तिघांकडून प्रत्येक दहा-दहा लाख रुपये गोळा केले मात्र प्रत्यक्षात नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अहिरे यांची तक्रार शहर पोलिसांनी दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिल्यानंतर शहर पोलिसांनी शुक्रवार, 7 जून रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक एच.बी.सूर्यवंशी करीत आहेत.

स्वतःची फसवणूक झाल्यानंतर इतरांनाही फसवले
आरोपी सिद्धेश याची रेल्वे प्रवासात सिंग नामक व्यक्तीशी ओळख झाली होती व त्याने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत नोकरी लावून देतो, असे सांगून सिद्धेशचा विश्‍वास संपादन केला व त्यापोटी मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली. सिद्धेशला परराज्यात बोलावून स्टेशन मास्तराचा गणवेश देण्यात आला व त्याने तेथे 15 दिवस काम केले मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने याच पद्धत्तीने ओळखीच्यांना गंडवण्याचा उद्योग सुरू केला. दरम्यान, बेरोजगारांना गंडा घातण्याकामी कलकत्त्यातील सिंग नामक व्यक्तीचा सहभाग असल्याची दाट शक्यता असून त्यालाही सहआरोपी केले जाण्याची शक्यता आहे.

कोट्यवधींची फसवणूक ; जिल्ह्यातील अनेकांना गंडा
आरोपींनी जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना गंडवल्याचा बाब उघड झाली असून या माध्यमातून आरोपींनी कोट्यवधीची माया जमवल्याचा दाट संशय आहे. नोकरी लागण्याच्या आशेपोटी अनेकांनी आपले घरासह शेतीही विकली आहे मात्र नोकरी न लागल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरोपींना तातडीने अटक करावी, अशी अपेक्षा फसवणूक झालेल्या युवकांमधून व्यक्त होत आहे.