नवी दिल्ली : मोदी सरकारवर रोजगाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली असतानाच, रेल्वे खात्यामध्ये लाखोंच्या संख्येनं नोकरभरती करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. रेल्वे खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच २.२० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठ-नऊ महिन्यांत ती पूर्ण होईल, असंही गोयल यांनी सांगितलं.
पीयूष गोयल म्हणाले की, ‘रेल्वेमध्ये २.२० लाख नोकर भरतीची घोषणा मी दहा दिवसांपूर्वीच केली आहे. त्यात पुढील दोन वर्षांत रिक्त होणाऱ्या पदांचाही समावेश आहे. कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल,’ कर्मचारी नियुक्तीच्या पुढच्या टप्प्यात सरकार पहिल्यांदाच गरीब सवर्णांसाठी दिलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणार आहे, रेल्वे कर्मचारी नियुक्तीसाठी सरकार पूर्णपणे संगणकीकृत प्रक्रिया राबवत आहे. परीक्षेची व्हिडिओग्राफी केली जाते, अशी माहितीही एका वृत्त वाहिनीला बोलताना गोयल यांनी दिली.