रेल्वेत वाढला चोरट्यांचा उच्छाद

0

भुसावळ । रेल्वेत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत महिलांचे दागिणे तसेच इतर साहित्य चोरटे लंपास करीत असतात. चोरीच्या घटनांना आळा घालण्यास रेल्वेची सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांचे साहित्य चोरीस जात असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लाग आहे. वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये रोख रक्कमेसह 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असून रेल्वे लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुरक्षा यंत्रणा आणखी कार्यक्षम करण्याची आवश्यकता आहे.

रोख रकमेसह मंगळसूत्र चोरी
नाशिक येथील रहिवासी सागर रविंद्रसिंग हजारी (वय 22) हे 14 रोजी पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधील एस-2 कोचने प्रवास करीत होते. रेल्वे भुसावळ येथील आऊटरवर आली असता आपली बॅग रेल्वेच्या शौचालयाजवळ ठेवली असता हि चोरट्यांनी लंपास केली. यात 10 हजार रुपयांची रोख रक्कम देखील होती. हजारी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल
वाघ करीत आहे.

तर दुसर्‍या घटनेत स्मिता आकाश मोहरकर (वय 38, रा. भुसावळ), मिना राजेंद्र सुतार, वैशाली दिनेश सोनवणे (दोन्ही रा. बुर्‍हाणपूर) या सोमवार 15 रोजी भुसावळ स्थानकावर भुसावळ – कटनी पॅसेंजरमध्ये चढत असताना स्मिता मोहरकर यांचे अडीच ग्रॅमचे 6 हजार रुपयांचे मंगळसूत्र, मिना सुतार यांचे 2 ग्रॅमचे 4 हजाराचे तर वैशाली सोनवणे 3 ग्रॅमचे 8 हजार रुपयांचे सोन्याचे पँडल लंपास केले. अशा एकूण 18 हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याबाबत स्मिता आकाश मोहरकर यांच्या फिर्यादीवरुन काळ्या सावळ्या रंगाच्या 15 वर्षीय एक डोळ्याने अंध तसेच हिरवे टिशर्ट घातलेल्या इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल देवकर करीत आहे.

31 हजार रुपयांची चोरी
गाडी क्रमांक 15067 अप गोरखपूर-बांद्रा एक्सप्रेसमधून अज्ञात चोरट्याने 31 हजार 300 रुपये व पर्सचोरी झाल्याची घटना घडली. आशिष पाटील (वय 34, रा. आनंद नगर, जामनेर) हे पत्नीसह गाडी क्रमांक 15067 गोरखपूर -बांद्रा टर्मिनस एक्सप्रेसने 26 एप्रिल रोजी झांशी ते भुसावळ प्रवास करतांना भोपाळ स्टेशन सोडल्यानंतर अज्ञात चोरट्याने गुलाबी रंगाची पर्स चोरी केल्याचे लक्षात आले.

2 मोबाईल लंपास
पाटील यांच्या पर्समध्ये एचटीसी कंपनीचा 22 हजार रूपये व अँसूस झेन फोन 2 कंपनीचा 7 हजार रूपये आसे दोन मोबाईल, रोख 2 हजार 300 रूपये, पँन कार्ड, आयडीबीआय बँकेचे एटीएम, मतदान, आधार कार्ड असा 31 हजार 300 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत आशिष पाटील यांच्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलीसात अज्ञात चोरट्याविरूद्ध शून्य क्रमांकाने नोंद करून भोपाळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला.