रेल्वेत विनयभंग करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक, एक फरार

0

नवी मुंबई । हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर या आठवड्यात दोन विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. यातील एका आरोपीला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसर्‍या गुन्ह्यातील आरोपीचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत.हार्बर मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्थानकात घडलेल्या पहिल्या घटनेत रेल्वे पोलिसांनी अक्षय कांबळे (18) या तरुणाला अटक केली आहे.

अक्षय व 15 वर्षीय पीडित मुलगी हे दोघेही एकमेकांच्या ओळखीतले आहेत. शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी मुंबईत जाण्यासाठी मानखुर्द रेल्वे स्थानकावर उभी होती. त्यावेळी आरोपी अक्षयने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिच्या हातावर आपला मोबाइल नंबर लिहून दिला व तिला फोन करण्यास सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी लोकलमध्ये चढली असताना अक्षयदेखील तिच्या पाठीमागच्या डब्यामध्ये चढला. त्यामुळे पीडित मुलीने गोवंडी रेल्वे स्थानकावर उतरुन आपल्या नातेवाइकांचे घर गाठले. त्यानंतर तिने घडल्या प्रकाराची सर्व माहिती नातेवाइकांना दिली. त्यानंतर नातेवाइकांनी अक्षयने दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन लावून त्याला गोवंडी येथे बोलावून घेतले. त्यानुसार अक्षय आल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी अक्षयवर विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

दुसरी घटना ही ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील 22 वर्षीय तरुणी कोपरखैरणे येथून लोकलने ठाणे येथे कामावर जात होती. सदर लोकल घणसोली रेल्वे स्थानकावर थांबली असताना, रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने पीडित तरुणीला पाहुन लैंगिक चाळे केले. या प्रकारामुळे लज्जित झालेल्या तरुणीने त्या विकृत व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या आईने वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर अज्ञात आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरेमठ यांनी दिली.