रेल्वेत विना तिकीट प्रवास : एकाच दिवसात 23 लाखांचा दंड वसुल

भुसावळ : रेल्वेत विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांची कमी नाहीत त्यातच जनरल बोगीत तिकीट तपासणी होत नसल्याने या डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांचीदेखील संख्या मोठी असल्याने अशा प्रवाशांवर कारवाईसाठी भुसावळ रेल्वे प्रशासनाने शनिवार, 17 रोजी भुसावळ विभागात धडक तपासणी मोहिम राबवली. या माध्यमातून तब्बल 23.27 लाखांचे उत्पन्न मिळवण्यात आले तर फुकट्या प्रवाशांच्या गोटात कारवाईने प्रचंड खळबळ उडाली.

यांनी केली मोहिम यशस्वी
भुसावळ डीआरएम एस.एस.केडीया, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आर.पी.एफ.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती-भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव विभागात एक दिवसीय तिकीट चेकिंग मोहिम राबवण्यात आली.

280 कर्मचार्‍यांचा मोहिमेत सहभाग
वाणिज्य निरीक्षक , तिकीट तपासनीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे 86 गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तीन अधिकारी, 180 तिकीट चेकिंग स्टाफ, 45 वाणिज्य स्टाफ व 55 आर.पी.एफ.स्टाफ असे एकूण 280 कर्मचारी सहभागी झाले.

अशी झाली दंडात्मक कारवाई
ओपन डिटेल स्टाफ यांनी तीन हजार 419 केसेसच्या माध्यमातून 19 लाख 97 हजार 565 रुपयांचा तर स्टेशन स्टाफने 203 केसेसच्या ामध्यमातून एक लाख पाच हजार 270 रुपयांचा तसेच अ‍ॅमेनिटी स्टाफने 293 केसेसच्या माध्यमातून दोन लाख 24 हजार 251 रुपयांचा दंड केला. एकूण तीन हजार 915 केसेसद्वारे 23 लाख 27 हजार 86 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.