रेल्वेबाधितांना पालिका देणार घरे

0

पुणे : रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्यांना रेल्वे प्रशासनाने हटविल्यामुळे त्यांना महापालिकेच्यावतीने हडपसर, वैदुवाडी येथे महापालिकेच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत. दरोडेमळा, संत गाडगे महाराजनगर, घोरपडी येथील जागांवरील सुमारे 140 घरे रेल्वेने अतिक्रमण म्हणून काढून टाकली होती. शुक्रवारी यासंदर्भात बैठक झाली. महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त विपिन वर्मा, प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाच्या एकूण 48 एकर जागेवर सुमारे 8 हजार घरे असल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्व कुटुंबे जुनी असल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.

सध्याच्या बाधित घरांपैकी 84 घरांची कागदपत्रे, पुरावे वगैरे सर्व पाहणी झाली आहे. उर्वरित 89 घरांची अशी तपासणी करणे बाकी आहे, मात्र ती होईल, अशी माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली. रेल्वे प्रशासनाने जागा ताब्यात घेत सर्व कुटुंबांना रस्त्यावरच आणले. थंडीने एका वृद्धाला प्राण गमवावे लागले. नगरसेवक उमेश गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठविला होता. हडपसर, वैदूवाडी येथे महापालिकेच्या इमारतीत 1700 सदनिका प्रकल्पबाधितांना दिलेल्या आहेत. शिल्लक सदनिका देता येतील, असे उपायुक्त अनिल मुळे यांनी सांगितले.