रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा राजीनामा

0

नवी दिल्ली : लागोपाठ झालेल्या दोन मोठ्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बुधवारी दुपारी सोपवला. मात्र, मोदींनी थोडे थांबा, असे म्हणत अद्याप प्रभूंचा राजीनामा स्वीकारलेला नाही. आठवडाभरात दोन रेल्वे अपघात झाल्याने प्रभू यांच्यावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे. बुधवारी पहाटे उत्तरप्रदेशातील औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेसने डंपरला धडक दिली आणि यानंतर एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 70 प्रवासी जखमी झाले.

चार दिवसात दोन अपघात
गेल्या आठवड्यात शनिवारी उत्तर प्रदेशमध्येच मुजफ्फरनगरमध्ये उत्कल एक्स्प्रेसला अपघात झाला होता. उत्कल एक्स्प्रेसचे डबेही रुळावरुन घसरल्याने सुमारे 24 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामुळे विरोधकांनी प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी करत रेल्वे मंत्रालयाला लक्ष्य केले होते. त्यातच बुधवारी पहाटे पुन्हा रेल्वे अपघात झाल्याने प्रभू चांगलेच अडचणीत आले. चार दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्याने प्रभूंच्या अडचणी वाढल्या आहेत.

रेल्वेसाठी रक्त, घाम गाळला
बुधवारी दुपारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यावर मोदींनी मला थांबा असे सांगितल्याचे सुरेश प्रभूंनी ट्विटरवरुन सांगितले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी रेल्वेच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले. रेल्वे सुधारण्यासाठी माझे रक्त आणि घाम गाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकांपासून कायम असलेल्या रेल्वे खात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. रेल्वेत गुंतवणूक आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो. यामुळेच मी मोदींकडे राजीनामा सोपवला, असे प्रभूं यांनी म्हटले आहे.

बोर्डाच्या अध्यक्षांचाही राजीनामा
चार दिवसात दोन रेल्वे अपघात उत्तरप्रदेशात झाल्याने रेल्वे बोर्ड अध्यक्ष आदित्य कुमार मित्तल यांनी राजीनामा दिला. रविवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने मित्तल यांच्यासह उत्तर विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. कुलश्रेष्ठ आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. एन. सिंग यांना पुढील सूचना येईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले होते.