मुंबई । हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनल या लांब पल्ल्याच्या गाडीतून मालाड येथे राहणारे प्रवासी तुलसी शहा (33) प्रवास करत होते. त्यांना कल्याण येथे अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला, त्यावर त्यांच्या भावाने थेट केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना ट्वीट केले. त्यानंतर त्या प्रवाशाला ताबडतोब वैद्यकीय मदत करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्वीट केल्यानंतर ही गाडी दादर येथे पोहोचली, तेव्हा लागलीच या गाडीत वैद्यकीय पथक चढले.
प्रवाशाला गाडीत आली चक्कर
तुलसी यांना त्वरित दादर रेल्वेस्थानकातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी असलेल्या खोलीत नेण्यात आले. त्यांना तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. काही वेळाने त्यांची तब्येत स्थिरावली. तुलसी यांची तब्येत सकाळपासून काहीशी बिघडलेली होती, जेव्हा ते गाडीत शौचालयातून बाहेर आले, तेव्हा ते अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. त्यावेळी त्यांचे भाऊ भुवनेश्वर यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्वीट केले. तसेच हेल्पलाइनला संपर्क केला होता. त्यानंतर लगेच तुलसीला सहाय्य मिळाले.