रेल्वेरोको करणार्‍या विद्यार्थ्यांवर लाठीमार

0

800 जणांविरुद्ध गुन्हे दाखल, दोघांना अटक
रेल्वेभरती परीक्षेतील गोंधळाविरुद्ध आंदोलन

मुंबई : रेल्वे परीक्षेतील भरती गोंधळाविरुद्ध आंदोलन करणार्‍या रेल्वे अ‍ॅप्रेंटिस विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, त्यात अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर सुमारे 800 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करून पोलिसांनी अमानुषतेचा कळस गाठला. पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांनाही अटक केली. भरती परीक्षेतील गोंधळ व अन्य मागण्यांसाठी सकाळी दादर-माटुंगा स्थानकादरम्यान हे आंदोलन करण्यात येत होते. त्यामुळे काहीकाळ रेल्वेची वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात मनसेनेदेखील उडी घेतली. त्यानंतर लाठीमार करण्यात आला. रेल्वे अधिकार्‍यांनी आंदोलनाची वेळेवर दखल न घेतल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. लाठीमारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी प्रत्युत्तर म्हणून लोकलवर दगडफेक केली.

प्रशिक्षणार्थींनाही लेखी परीक्षा द्यावी लागेल
रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असतानाही त्या भरल्या जात नाहीत, त्या त्वरित भरण्यात याव्यात. पूर्वी रेल्वे प्रशिक्षणार्थींना थेट रेल्वे सेवेत सामावून घेतले जायचे. मात्र त्यांच्यासाठी आता केवळ 20 टक्के कोटा ठेवण्यात आला आहे. यामध्ये जागा मिळवण्यासाठीही त्यांना लेखी परीक्षा द्यावी लागेल, अशी अट रेल्वे प्रशासनाने घातली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करूनही अशा अटींद्वारे त्यांना डावलले जात आहे. अशा अटीनंतर केल्या जाणार आहेत हे पूर्वीच माहित असते तर आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले नसते, अशा भावना संतप्त विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. यामुळे ही अट कायमची रद्द करून त्यांना पूर्वीप्रमाणे सेवेत सामावून घेतले जावे, अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. या सर्व मागण्या आम्ही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या होत्या. मात्र त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे.

आंदोलनाला राज ठाकरेंची साथ
मनसेचे शिष्टमंडळ 21 मार्चरोजी दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थी मुलांचे शिष्टमंडळही सोबत असणार आहे. मंगळवारी राज ठाकरे यांनी रेल्वेतल्या प्रशिक्षणार्थींची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी प्रशिक्षणार्थींना भरती प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. एमआयजी क्लबजवळ मनसेच्या पदाधिकार्‍यांची बैठक होती. त्याआधी आंदोलकांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली. आंदोलकांसोबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करुन घेऊ, असे आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना दिले.