रेल्वेलगतच्या झोपड्यांसाठी धोरण हवे

0
पालिका आयुक्तांचे निवेदन
पुणे : रेल्वेच्या मालकीच्या जागेत २७ ठिकाणी झोपडपट्टया असून त्या हलवायच्या असतील तर त्यांच्या पुनर्वसनाचे धोरण ठरवायला हवे असे निवेदन महापालिका आयुक्त सौरव राव यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत केले.
रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रेल्वेच्या मालकीच्या रामटेकडी येथील जागेतील झोपड्या हटविण्यात आल्या. याबाबत चेतन तुपे, सुभाष जगताप, उमेश गायकवाड, प्रशांत जगताप यांनी प्रश्न मांडून लक्ष वेधले. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी केली. अशा झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याची तरतूद नाही असे राव यांनी स्पष्ट केले. मात्र, ठाणे आणि मुंबई येथे रेल्वेच्या जागेतील झोपड्यांचे पुनर्वसन कसे केले जाते त्याची माहिती मी घेतली आहे. त्यानुसार रेल्वेला प्रस्ताव सादर केला जाईल. रेल्वेकडून सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद आयुक्तांनी व्यक्त केला. आयुक्तांच्या निवेदनानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी रामटेकडी येथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन व्हावे असा आदेश प्रशानाला दिला.