रेल्वेलाईनजवळ सोय केल्याने संतप्त प्रतिक्रीया

0

पालकांची विद्यार्थ्यांसोबत पालिकेसमोर निदर्शने

पिंपरी : चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीतीत पोलीस आयुक्तालय करण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. शाळा स्थलांतर करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी आज (सोमवारी) महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांना दळवीनगर येथील रेल्वे लाईनला लागून असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा ‘खडखडाट’ सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी सरकारने विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक पालकांनी दिली.

पालकांचा आंदोलनाचा इशारा
प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरित करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. मात्र, पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्‍वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात पालकांनी तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी पालकांनी विद्यार्थ्यांसह महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी महात्मा फुले इंग्रजी माध्यमाची शाळा भरत असून अंदाजे साडेसहाशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिकणारे बहुतांशी विद्यार्थी हे झोपडपट्टी, चाळीमध्ये राहणारे, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. अनेक विद्यार्थी घरकाम करणार्‍या, हातगाडीचा व्यवसाय करणार्‍या, असंघटीत क्षेत्रातील मजूर, कामगार आदी पालकांची मुले आहेत. या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी दिल्यास थेरगाव, वाल्हेकरवाडी, लिंक रोड, आनंदनगर, वेताळनगर आदी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडणार आहे.

शिक्षणाचा बोजवारा उडू नये
एकीकडे शिक्षणातील गळती रोखण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत असताना, दुसरीकडे शिकणार्‍या मुलांच्या आयुष्यावरच नांगर फिरविण्याचे षड्यंत्र महापालिका करीत आहे. पोलिस आयुक्तालयासाठी शहरामध्ये अनेक पर्याय आहेत. पण, त्यासाठी साडेसहाशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा करू नये, तसेच प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी देऊ नये, त्यासाठी इतरत्र पर्याय शोधावा, अशी प्रतिक्रिया आंदोलक पालकांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना दळवीनगर येथील रेल्वे लाईनला लागून असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा ‘खडखडाट’ सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही. त्यामुळे आम्हाला प्रेमलोक पार्क येथीलच शाळा हवी आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी देखील पालकांनी विद्यार्थ्यांसह आंदोलन केले होते. त्यावेळी आयुक्त रजेवर असल्यावे पालकांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली होती. आता आयुक्त आल्यानंतर आज पुन्हा निदर्शने करण्यात आली.