भुसावळ । भुसावळ हे रेल्वेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी दिवसभरात हजारो प्रवासी ये- जा करतात. त्यामुळे येथून जाणार्या रेल्वे गाड्यांची संख्या लक्षात घेता कचरा देखील मोठ्या प्रमाणावर गोळा होत असतो. मात्र या कचर्याचे करायचे तरी काय? असा प्रश्न नेहमीच रेल्वे प्रशासनासमोर उपस्थित होतो. या कचर्याची विल्हेवाट करणे एक डोकेदुखी असते, मात्र आता या कचर्यातूनही रेल्वेला उत्पन्न मिळणार असून भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने कचर्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागात ऑईल डेपोला लागून गार्डनच्या जवळ हा प्रकल्प आकारास आला असल्याची माहिती भुसावळ रेल्वच्या अधिकृत सूत्रांनी दिली. हा प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर असला तरी यात अत्याधुनिकता आणून याचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे या गांडूळ खतविक्रीतून रेल्वे प्रशासनास अतिरीक्त उत्पन्न देखील मिळणार आहे.
प्रकल्पात अत्याधुनिकता आणणार
रेल्वे स्थानकावर उभा राहिलेला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प हा बहुदा मध्य रेल्वेतील स्थानकावर पहिलाच प्रकल्प असावा, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. रेल्वे स्थानकावर पूर्वी ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता, त्याच ठिकाणी दहा टँक उभारण्यात आले आहेत. यात सहा मीटर आकाराचे व 30 लीटर क्षमतेचे टँक आहेत. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. यात अजून आधुनिकता आणली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. भुसावळ रेल्वे स्थानकावरील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात तयार होणार्या खताचा सध्या रेल्वे कॉलनीतील बागांमध्ये वापर केला जात आहे. प्रकल्प सुरू होऊन महिना झाला आहे.
कचर्याचीही लागणार योग्य विल्हेवाट
येथील रेल्वे स्थानकावरुन दिवसाला 135 प्रव्रासी गाड्या धावत असतात. या स्थानकावरुन रोज 35 हजार प्रवासी जा-ये करीत असतात. त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांनी खाऊन टाकून दिलेले खाद्य पदार्थ व केळीची साल असा रोज गोळा होणारा कितीतरी टन कचर्याची विल्हेवाट लावणे अवघड असल्याने डीआरएम आर.के. यादव आणि आरोग्य विभागाने स्थानकार गोळा होणार्या कचर्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन हा प्रकल्प आकारास आणला आहे.
असा उभारला प्रकल्प
भुसावळ रेल्वे स्थानकाचा प्रचंड विस्तार आहे. रोज शेकडो प्रवासी गाड्या येथून सर्वच दिशांना धावतात. रोज हजारो प्रवासी येथून जा – ये करतात केळीचा हा प्रांत आहे. उरलेले खाद्य पदार्थ आणि केळीच्या साली याचा मोठा कचरा होतो. त्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आकारास आला आहे.
व्यापक स्वरुप द्यावे
देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत असतो. याची कशी विल्हेवाट लावावी हिच समस्या असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प व्यापक स्वरुपात राबविण्याची गरज आहे. येथील प्राथमिक स्वरुपाच्या प्रकल्पात अजून बर्याच सुधारणा करायच्या आहेत. सध्या रेल्वे स्थानकावर पडलेला दिवसाला जो काही कचरा गोळा होतो त्यावर या प्रकल्पात प्रक्रिया होऊन गांडूळ खत निर्माण केले जात आहे. भविष्यात शेतीसाठी त्याचा वापर होऊन रेल्वे उत्पन्न मिळू शकेल. भविष्यात याद्वारे रेल्वेला उत्पन्न मिळेल असे नियोजन आहे.