रेल्वेसमोर उडी; बापासह मुलाचा मृत्यू

0

जळगाव। शहरातील रेल्वेस्थानकावर मध्यरात्री सिंधी कॉलनीत राहणार्‍या पती-पत्नीने मुलासह भरधाव रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला असून रुग्णालयात सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गणपती रुग्णालयात दाखल केलेल्या आईची प्रकृती गंभीर आहे. हे कुटुंब सिंधीकॉलनीत वास्तव्यास होते. रेल्वे स्थानकावर झालेल्या कटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मोठी गर्दी झाली होती. प्रवाशाच्या मदतीने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

हबिबगंज-कुर्ला एक्स्प्रेससमोर उडी
1 एप्रिलरोजी मध्यरात्री 1.05 वाजेदरम्यान रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक 2 वर सूनील कावना (वय-33), सौ. किर्ती कावना (वय-27), मुलगा यश (वय-6 वर्ष) हे कुटूंब फिरत होते. सुरत – भुसावळ रेल्वेची वाट पाहात प्रवाशी उभे होते. याचवेळी रेल्वेस्थानकावरून सुपरफास्ट रेल्वेगाडी हबिबगंज-कुर्ला जात असल्याची सूचना करण्यात आली. स्थानकावर उभे असलेले कावना दाम्पत्याने मुलासह अचानक भरधाव येणार्‍या रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेचालकाच्या लक्षात येताच त्याने गाडीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सूनील कावना यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रूग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी मृत आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. सौ.किर्ती आणि यश रेल्वेच्या धडकेने बाजूला फेकले गेले. त्यांची प्रकृतीचिंताजनक होती. उपचारादरम्यान यशचा मृत्यू झाला .