रेल्वेसह फॉरेस्टमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष : पाचोरा तालुक्यातील युवकांकडून उकळले 38 लाख

38 lakhs extortion to the unemployed of Pachora taluka with the lure of railway jobs पाचोरा : शासकीय सेवेतील विविध पदांवर नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील बेरोजगारांना 38 लाख 38 हजार 500 रुपयांचा गुंडा घालणार्‍या आरोपीविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण शरद पाटील (खाजोळा, ता.पाचोरा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने बेरोजगार तरुणांना रेल्वेत गँगमन, टीसी तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई आदी पदांवर नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने लाखोंची रक्कम उकळली मात्र नोकरी न मिळाल्याने व पैसेही परत न केल्याने तक्रारदारांनी पाचोरा पोलिसात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या.

दोन स्वतंत्र फिर्यादीद्वारे गुन्हा दाखल
या प्रकरणी कैलास अशोक पाटील (41, तारखेडा ता.पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी भूषण पाटील याने रेल्वेत गँगमन, तिकीट निरीक्षक तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष देत प्रत्येकी उमेदवाराकडून 10 लाख रुपये उकळले. कैलास पाटील यांच्यासह काही तरुणांनी 7 जानेवारी 2020 ते 20 जून 2022 दरम्यान वेळोवेळी फोन पे, गुगल पे, एनईएफटी, आरटीजीएसने 24 लाख 38 हजार 500 आरोपीला दिले मात्र भूषण पाटील याने दोघांना नोकरी लावली नाही तसेच घेतलेले पैसेही परत दिले नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पाचोरा पोलिसात शरद पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश पाटील करीत आहेत.

चिंचखेड्याच्या बेरोजगाराकडूनही चार लाख उकळले
दुसरी तक्रार छायाबाई दिलीप पाटील (52, चिंचखेडा ता.पाचोरा) यांनी दिली असून त्यानुसार त्यांच्या मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने आरोपी भूषण शरद पाटील याने वेळोवेळी चार चार लाख रुपये उकळले मात्र नोकरी न मिळाल्याने व पैसेही परत न मिळाल्याने फसवणुकीची खात्री झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भगवान चौधरी हे करीत आहेत.