रेल्वेस्टेशनवर रात्री झोपायचे अन् भरदिवसा शहरामध्ये चोर्‍या

0

उघड्या घरांमधून एैवज लांबविणार्‍यांचा पर्दाफाश ; स्थानिक गुन्हे शाखेकडून एकाला अटक

जळगाव- ज्या शहरांमध्ये चोर्‍या करायच्या त्या शहरांमधील व्हीआयपी कॉलन्यांमध्ये रेकी करायची, रात्री त्या शहरातील रेल्वेस्टेशनवर झोपायचे अन् दिवसा रेकी केलेल्या व्हीआयपी कॉलन्यांमध्ये भरदिवसा उघड्या घरांमधून एैवज लांबविणार्‍या चोरट्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पर्दाफाश केला आहे. पथकाने दिपक किशोर झारु वय 27 मूळ रा. बर्‍हाणपूर ह.मू. भुसावळ यास ताब्यात घेतले आहे. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने शहरात रामानंदनगर परिसरातच चोर्‍या केल्याचे निष्पन्न झाले असून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

शहरतील शिवकॉलनी परिसरात 16 एप्रिल रोजी हवा येण्यासाठी दरवाजा उघडे ठेवून झोपलेल्या भाडे तत्वावर खोल्यांमध्ये राहणार्‍या तीन मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली होती. या चोरट्यांनी तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 26 हजार 400 रुपयांचा एैवज लांबविला होता. चोरट्यांच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना सुचना केल्या होत्या.

अहमदनगरसह जळगावात अनेक गुन्हे दाखल
रोहम यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल इंगळे, सुरेश महाजन, संजय सपकाळे, रमेश चौधरी, संतोष मायकल, मिलिंद सोनवणे, रा.का.पाटील, अशोक पाटील, विजय पाटील, रविंद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे असे दोन वेगवेगळे पथक तयार केले होते. पथकांनी आरोपींतांची माहिती काढली असता, दिपक झारु हा भुसावळ शहरातून जळगावात येवून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने गणेश नारायण काळे, रा.सैलानी, बुलढाणा याच्या मदतीने चोर्‍या केल्याची कबूली दिली असून त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन परिसरात झोपून त्याच शहरात व्हीआयपी कॉलन्यांमध्ये चोर्‍या करत असून आतापर्यंत त्याने रामानंद नगर परिसरातूनच एैवज लांबविल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याला पुढील तपासासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.