शेंदुर्णी । येथील रेल्वेस्टेशन ते स्टेट बँक रस्त्याचे काम 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्याचा मुहूर्त जामनेर सार्वजनिक बांधकाम व विभागाचे अधिकारी वर्गाला गवसला खरा परंतु रस्ता कसा व कीती मिटर रुंदीचा? दुभाजक असणार की नसणार? रस्त्यावरील रुंदी करनास नडणारी वृक्ष केव्हा कापली जाणार? रस्ता डांबरी की सिमेंटचा होणार, रस्ता किती मीटर लांबीचा होणार असे एक ना अनेक विषयावर नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुठलेही उत्तरे देत नाहीत. जागेचे उपलब्धते नुसार कुठे जास्त रुंदीचे तर कुठे कमी रुंदीचे खोदकाम करून ठेकेदार रस्ता तयार करतांना दिसत आहे. या विषयी नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी समान रुंदीकरण व दुभाजक टाकूनच रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
ठेकेदारांकडून थातुरमातुर काम सुरू
ठेकेदारांकडून कुठे खोदकाम न करताच वरचेवर खडी पसरवून दबाई केली जात आहे. त्यातच अडथळा निर्माण करणार्या वृक्षांना कापण्यासाठी नंबर टाकलेले आहेत परंतु वृक्ष न कापताच रस्ता तयार करण्यात येत असल्याने नागरिकांत रस्त्या विषयी अनेक शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या कामाच्या ठिकाणी केवळ रस्ता आखणी पुरतेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत आहे. संपूर्ण रस्त्याचे काम ठेकेदारांवर भरोसा ठेवून पूर्ण केले जात आहे. त्यामुळे कामावर लक्ष ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी उपलब्ध नाही की कामाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे याबाबत विषयी संभ्रमावस्था आहे. तसेच रस्त्या लगतच्या अतिक्रमीत जागा सोडून रस्ता तयार केला जात असल्याने रस्त्याचे सर्वत्र समान रुंदीकरण होतांना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतिक्रमण काढून विभागाचे मालकीची जागा ताब्यात घेण्यात कुचराई करीत असल्याचे दिसून येत आहे.