रेल्वेस्थानकांवर दोन लाख स्क्रीन लावणार

0

नवी दिल्ली । अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रवाशांना नवनव्या सोयी व सुविधा उपलब्ध करण्यावर नेहमीच भर देत असलेल्या भारतीय रेल्वेने आता देशभरातील रेल्वे स्थानकांवर सुमारे दोन लाख स्क्रीन लावण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. सर्व स्थानकांवर स्क्रीन लावण्यात आल्यानंतर आगामी दहा वर्षांत किमान दहा हजार कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची रेल्वेला अपेक्षा आहे.

प्रवाशांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी रेल्वेने उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू स्वत: यावर काम करीत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी विदेशी गुंतवणूकदारांसाठीही रेल्वेचे विविध क्षेत्र खुले केले आहेत. आता त्यांनी डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील सर्व स्थानकांवर दोन लाख डिजिटल स्क्रीन लावण्याची योजना त्यांनी तयार केली आहे. या स्क्रिनवरील जाहिरातींमधून त्यांना आगामी दहा वर्षांत 10 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

या स्क्रीनच्या माध्यमातून प्रवाशांना गाड्यांची वास्तविक वेळ आणि अन्य स्वरूपाची माहिती देण्यात येणार आहे. रेल्वे प्रदर्शन नेटवर्ककडे यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी गुगलनेही तयारी दर्शविली आहे. गुगलने यासाठी जाहिराती तंत्रज्ञान आणि प्रारूप विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि रिलायन्स यासारख्या कंपन्याही या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे दूरदर्शनपेक्षाही सर्वात मोठा जाहिरात मंच निर्माण होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रदर्शन नेटवर्कच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 400 रेल्वे स्थानकांवर स्क्रीन लावण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निविदा मे महिन्यात काढण्यात येणार आहेत. मोठ्या आणि लहान डिजिटल स्क्रीन जुनी दिल्ली, गोरखपूर, ग्वाल्हेर आणि वाराणसी स्थानकावर आधीच प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आल्या आहेत.