रेल्वेस्थानकाच्या फलाट वाढीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू

0

नवी मुंबई : पनवेल रेल्वेस्थानकाच्या फलाट वाढीसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात तीन मुली बुडून मृत पावल्याची घटना घडली आहे. रेल्वेस्थानक लगतच्या मोकळ्या जागेत मुली खेळत असताना सदरील घटना घडली.

रेशम भोसले (१३), रोहिता भोसले (१०) व प्रतीक्षा भोसले (०८) अशी मृत मुलींची नावे आहेत. तिघीही मूळच्या अमरावतीच्या असून कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करीत असतं. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वेस्थानकाजवळील मोकळ्या जागेत खेळत होत्या. त्याचठिकाणी रेल्वेस्थानकाच्या वाढीव बांधकामासाठी खोदकाम केलेले आहे. त्यात तिघीही पडल्याने साचलेल्या पाण्यात बुडाल्या. हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिक व रजत एकता मित्र मंडळाच्या तरुणांनी तिघींनाही पाण्यामधून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले होते. यामुळे एकीला पालिका रुग्णालयात तर दोघींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिघींनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले.