जळगाव । शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील चहाच्या दुकानाजवळ धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून अज्ञात 15 ते 20 जणांच्या टोळीकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत तिघे जखमी झाले असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करित आहे.
चौधरी टी स्टॉलजवळील घटना
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील असोदा येथील पाटील वाड्यातील रहिवाशी असलेले योगेश डिंगबर कोल्हे व सुरज मुरलीधर पाटील हे दोघे रेल्वेस्टेशन परिसरातील चौधरी टी स्टॉल येथे चहा पीत असतांना एका तरुणाचा सुरज पाटील याला धक्का लागला. दरम्यान धक्का लागल्याचा सुरज याने जाब विचारल्याच्या कारणावरून त्या तरुणाने त्यांच्या मित्रांना बोलविले. त्यानंतर 15 ते 20 जणांच्या टोळीने योगेश कोल्हे, सुरज पाटील, सुरेश पाटील रा. भगवान नगर या तिघांना धारदार शस्त्र, कमरेचा पट्टा, दगड, चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिघांच्या डोक्याला, हाता,पायाला गंभीर दुखापत झाली असून मारहाणीदरम्यान योगेश याचा ऍपल कंपनीच्या महागड्या मोबाईलचे तरुणांच्या टोळीने दगड मारून नुकसान केले आहे. या मारहाणीत तिघांना दुखापत झाली असून जखमी योगेश कोल्हे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात 15 ते 20 जणांच्या टोळीविरुध्द भादवी कलम 326, 324, 323, 143, 144, 147, 148, 504, 427 यासह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही करीत आहे.