रेल्वेस्थानकावर कुलीसह चोरी करणार्‍या दोघांना अटक

0

भुसावळ । रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर संशयास्पद अवस्थेत फिरणारे दोन व्यक्ती हे प्रवाशांच्या खिशांना हात लावताना आढळून आले असता त्यांना रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्यांनी रेल्वेत नियमित चोर्‍या करीत असल्याची कबुली दिली असून त्यांच्यासोबत एका कुलीचा समावेश असल्याचे सांगितल्यावरुन रेल्वे पोलीसांनी या तीघांना अटक केली आहे. रेल्वेस्थानकावर उपनिरीक्षक एस.एस. हरणे यांच्या सोबत शेख नावेद, आरक्षक दीपक शिरसाठ, हवालदार प्रशांत साळुंके, युसूफ तडवी, योगेश घुले हे नियमितपणे गस्त घालत असताना शुक्रवार 14 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास गाडी आली असता जनरल डब्यात दोन जण संशयास्पद स्थितीत रेल्वेत चढणार्‍या प्रवाशांचे खिशांना हात लावताना आढळून आले.

मतदान कार्डासह मोबाईल केले जप्त
रेल्वे पोलीसांनी शेख सोहेल शेख सलीम (वय 30, रा. नांदुरा, जि. अकोला), अंकीत गणेश गवई (वय 19, रा. तारफेल, जि. अकोला) यांना अटक करण्यात केली. शेख सोहेल याच्या ताब्यातून काळ्या रंगाचे जुने पाकिट ज्यामध्ये राकेश कुमार नावच्या व्यक्तीचे विहारमधील परिचयपत्र, आधार कार्ड, एसबीआय परिचय पत्र, 80 रुपये रोख आणि मतदान कार्डसह मोबाईल जप्त करण्यात आले. त्याने हे साहित्य रेल्वे प्रवाशाच्या खिशातून काढले असल्याची कबुली दिली. या दोघांनी आपण रेल्वे स्थानकावर चोरी करीत असल्याची कबुली दिली आहे. ते भुसावळ ते अकोला दरम्यान जाणार्या रेल्वेत चोर्‍या करीत असतात. यात सलीम खान करीम खान (वय 42, रा. नसरवानजी फाईल, भुसावळ) हा सुध्दा चोरीत सहभागी असल्याचे सांगितले असता कुली सलीम खान करीम खान याला पकडण्यात आले असून त्याच्याकडून सॅमसंग मोबाईल, दोन सिमकार्ड ताब्यात घेतले.