जळगाव । जळगाव सुरत दुहेरी रेल्वे मार्गातील पाळधी ते जळगाव या 9 किलोमीटरच्या नव्याने तयार झालेल्या रेल्वेरूळाची चाचणी रविवारी दिवसभर करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत या रेल्वेरूळावरून 130 किलो मीटर प्रतितास वेगाने विशेष रेल्वेगाडी धावली. या यशस्वी चाचणीनंतर 15 दिवसांनी हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी पाळधी ते धरणगाव या मार्गाची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी पाळधी ते जळगाव रेल्वेरूळालगत दांडेकरनगर झोपडपट्टी होती. त्यामुळे येथे निर्माणकार्य थांबले होते. हे अतिक्रमण काढल्यानंतर 9 किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. रविवारी पश्चिम रेल्वेचे चीफ सेफ्टी कमिशनर सुशील चंद्र, चीफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफीसर एम.के.गुप्ता, सुरत येथील डेप्युटी चीफ इंजिनिअर एस.पी.भेरवा यांच्या उपस्थितीत रेल्वेरूळाची चाचणी घेण्यात आली.