शक्तिपुंजपाठोपाठ राजधानी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली
सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोमभद्रमध्ये शक्तीपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रुळांवरुन घसरले. शक्तीपुंज एक्स्प्रेस हावड्याहून जबलपूरला जात असताना हा अपघात झाला. अपघातात जीवितहानी झाली नाही. गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. वेग कमी असल्याने अनर्थ टळला. हा अपघात घडल्यानंतर काही तासातच दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ रांची-राजधानी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकाच दिवसात घडलेली ही दुसरी रेल्वे दुर्घटना आहे. तर महिनाभरातील हा चौथा अपघात आहे.
प्रभू गेले, गोयल आले तरी अपघात सुरूच!
याआधी हावडा येथून जबलपूरला निघालेली शक्तिपुंज एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी सोनभद्र जवळील फफराकुंड स्टेशनजवळ रुळावरुन उतरली. दुसरीकडे, कानपूरजवळ कालिंदी एक्स्प्रेसही रूळावरून घसरताना थोडक्यात बचावली. तर, फर्रुखाबाद-फतेहगड दरम्यान रेल्वे रुळाचे तुकडे-तुकडे झाल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लाल कपडा फडकवत या मार्गावरील रेल्वे रोखल्या. रेल्वे अपघातांच्या मालिकेनंतर सुरेश प्रभुंनी पंतप्रधानांनी भेट घेऊन राजनामानाट्य घडवून आणले होते. आता 3 सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात पियूष गोयल यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद आले. मात्र नवीन मंत्र्यांना पदभार स्वीकारुन जेमतेम चार दिवस होत नाही तोच पुन्हा रेल्वे अपघातांची मालिका सुरू झाली आहे.
रेल्वे रुळ जुने, कमकुवत
हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसचे गुरुवारी सकाळी इंजिनासह सहा डबे रुळावरुन घसरले. भारतीय रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्यांनी सांगितले की, घसरलेल्या डब्यांतील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना रेल्वेच्या दुसर्या डब्ब्यांमध्ये जागा देण्यात आली आहे. रेल्वे रुळ जुने आणि कमकुवत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही सुरक्षा आणि रेल्वे रुळ बदलण्यासाठीच्या फंडांमध्ये वाढ केली आहे. दुसरीकडे, मथुरा-कानपूर रेल्वे मार्गावर फर्रुखाबाद-फतेहगड दरम्यान रेल्वे रुळ 3 इंच तुटलेला आढळल्याने खळबळ उडाली. स्थानिकांनी लाल कपडा दाखवून कालिंदी एक्स्प्रेसला वेळीच थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.