नवी दिल्ली: वाढत्या रेल्वे अपघातांमुळे क्रिकेटपटू गौतम गंभीर अधिक गंभीर झाला असून आधी रेल्वे अपघात थांबवा मग बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहा असे त्याने ट्विट केले आहे. रेल्वे अपघात रोकण्यात सरकारला अपयश येत आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये ३० पेक्षा अधिक रेल्वे अपघात झाले आहेत. या रेल्वे अपघातांकडे लक्ष तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, बुलेट ट्रेनचे स्वप्न नंतरही पाहता येऊ शकते असे म्हणत त्याने आपला रोष प्रकट केला आहे.
‘मागील २ महिन्यांमध्ये रेल्वे रुळावरुन घसरुन ३ अपघात झाले आहेत. आपल्या स्थितीमध्ये अजूनही सुधार होत नसल्याचे दिसत आहे. हे दुःखद आहे,’ असे गंभीरने म्हटले. गेल्या ४ वर्षांमध्ये अनेक वेळा रेल्वे रुळावरुन डबे घसरले आहेत. त्यामध्ये ३३० जणांचे प्राण गेले आहेत. कुठलीही नुकसान भरपाई दिली तरी हे जीव परत येणार नसल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. एकदा घटना झाल्यावर त्यावर शोक व्यक्त करणे किंवा घटनास्थळाची पाहणी करणे याचा काहीच फायदा नाही असे त्याने पुढे म्हटले आहे. आपण रेल्वेची प्रगती करण्याच्या गोष्टी करतो. बुलेट ट्रेनबद्दल बोलतो, परंतु मुळात सध्या ज्या रेल्वे सुरू आहेत त्यांच्या स्थितीकडे आपण केव्हा पाहणार आहोत? असा सवाल त्याने केला आहे.