रेल्वे अपघातानंतरही लोकांचा सेल्फी घेत होते; धक्कादायक माहिती समोर

0

अमृतसर : रावण दहनाच्यावेळी झालेल्या रेल्वे अपघातात ६० लोकांचा मृत्यू झाला तर ५१ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना झाल्यानंतर एकीकडे आक्रोश सुरू असतानाच दुसरीकडे काही लोक कार्यक्रमाचे व्हिडिओ बनवत होते आणि रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी घेत जल्लोष करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर या रावणदहनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एवढी मोठी दुर्घटना कशी झाली हे कुणालाही माहीत नाही. सर्व जल्लोष करत होते. रेल्वेरुळावर सेल्फी घेत होते, असं नवज्योत कौर यांनी सांगितलं. दरम्यान, अपघात झाल्यानंतरही रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी घेण्याच्या लोकांच्या वृत्तीवर अनेकांनी संताप व्यक्त केला असून राजकीय नेत्यांपासून सर्व सामान्यांनीही लोकांच्या या वृत्तीवर ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. ‘ही दुर्घटना टाळता आली असती. रेल्वे अपघातात लोक चिरडले गेलेले असतानाही काही लोक या घटनेचं शुटींग करत होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना किती भयावह होती हे दिसून येते’, असं ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनीही लोकांच्या या संवेदनशुन्य वृत्तीवर जोरदार टीका केली आहे. ट्रेनने चिरडल्यानंतरही लोक मदत करण्याऐवजी मोबाइलवर त्याचे व्हिडिओ बनवत होते, असा संताप त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात रावणदहनाचं आयोजन केलं जातं. मात्र यावेळी फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे रेल्वेचा हॉर्न ऐकू आला नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

एक दिवसाचा दुखवटा जाहीर

या भीषण दुर्घटनेनंतर पंजाब सरकारने मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर करतानाच आज राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.