नवी दिल्ली । जागतिक निर्देशांकाप्रमाणे देशातील रेल्वे अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. रेल्वेवरील शून्य अपघातांसाठी 10 हजार कोटींची तरतूद केली असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत दिली. विनियोजन विधेयकावरील चर्चेला प्रभू उत्तर देत होते.
रेल्वेवरील अपघात कमी करण्यासाठी रेल्वे रुळ आणि त्याखालील पट्टी बदलण्याची आवश्यकता आहे. रेल्वे मार्ग अद्ययावत करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यादृष्टीने ही तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशमधील महोबा येथे महाकौशल एक्सप्रेसला झालेला अपघात दुर्दैवी आहे. रेल्वे अपघातांचा प्रमाण कमी करून शून्य अपघाताचे आमचे लक्ष्य आहे. रेल्वेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून असे अपघात टाळण्यासाठी एक लाख कोटींचा निधी तयार करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षात देशभरातील सर्व रेल्वे फाटक मानवविरहीत करण्यात येणार आहेत . रेल्वेचा सर्वाधिक खर्च हा रेल्वे गाड्यांना लागणार्या वीजेसाठी केला जातो. याचे प्रमाण कमी करण्यासाठी योजना तयार केली जात असून त्यामुळे रेल्वेची 41 हजार कोटींची बचत होणार आहे. यासाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या पर्यायांचा विचार रेल्वे मंत्रालयाकडून केला जात आहे. तसेच वीजेचा वापर कमी होण्यासाठी एलईडी बल्ब वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती प्रभू यांनी दिली.
नागरिकांना रेल्वेकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालय पूर्णपणे प्रयत्नशील आहे. मात्र यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. सध्या रेल्वेला मिळत असलेल्या महसूलात हा विकास होणे शक्य नाही, यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. नव्या तंत्रज्ञानाशिवाय रेल्वे अपघात रोखण्यात यश येणार नाही, असे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांमध्ये रेल्वेमध्ये होणार्या गुंतवणुकीचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे रस्ते मार्गावरील गुंतवणूक वाढली. रेल्वेच्या माल वाहतुकीतही घट झाली आहे.