रेल्वे अ‍ॅप्रेंटीस धारकांच्या समस्याबाबत खासदार रक्षा खडसेंचे प्रशासनाला साकडे

0

सकारात्मक निर्णयाची अपेक्षा : फार्म भरताना तांत्रिक चुका झाल्याचा उमेदवारांना फटका

भुसावळ- रेल्वेत भरल्या जाणार्‍या अ‍ॅप्रेंटीस धारकांच्या जागेत जिल्ह्यातील काही उमेदवार तांत्रिक चुकांमुळे डावलले गेल्याने त्यांना न्याय मिळण्यासाठी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांची भेट घेत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा केली. आयटीआय उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना रेल्वेत अ‍ॅप्रेटींस करण्यासाठी रेल्वेने जुलै महिन्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती शिवाय त्याबाबतच्या अटी व शर्ती त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या होत्या मात्र शंभरापेक्षा जास्त पात्र विद्यार्थी अपात्र ठरल्याने त्यांनी खासदारांकडे तक्रार केली होती. सोमवारी खासदार भुसावळात आल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाचे एडीआरएम मनोज सिंह व विभागीय कार्मिक अधिकारी मनोज गांगुर्डे यांची भेट घेत विद्यार्थ्यांची बाजू मांडली.

विद्यार्थ्यांनी चूक केल्याने फटका -रेल्वे प्रशासन
यावेळी रोझोदा येथील यामिनी लक्ष्मण टोंगळे या विद्यार्थिनीची प्रातिनिधीक स्वरूपातील तक्रार मांडण्यात आली. विद्यार्थ्यांनी फार्म भरताना तांत्रिक चूक केल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले तर यापुढे फार्म भरताना सूचना काळजीपूर्वक वाचून फार्म भरावा, अशा सूचना खासदारांनी केल्या. प्रसंगी रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, सुदाम सोनवणे, बाळा पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय डी.एल.शुक्ला, एसआयबीचे रोशन सिंग यांनी बंदोबस्त राखला.