जीवावरचे पायावर निभावले
पिंपरी : चिंचवड रेल्वे स्टेशनवर लोकल पकडताना पडलेल्या प्लॅटफार्ममध्ये अडकलेल्या एका महिलेची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. नीता गंगावणे (वय 31, रा. सुखापूर, पनवेल) असे अपघातातून बचावलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस हवालदार अनिल बागूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता या पती संजय आणि मुलगा सिद्धार्थ यांच्यासह वाहनाने पनवेलवरून चिंचवड येथे उतरल्या. त्यांना देहूला जायचे असल्याने दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास रेल्वे लोकलने त्या चालल्या होत्या. मात्र लोकलमध्ये चढत असताना त्याचा पाय घसरला व त्या प्लॅटफॉर्म आणि लोकलच्यामध्ये अडकल्या.
तेवढ्यात लोकल सुरू झाल्याने नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस हवालदार पुरुषोत्तम कर्दाळे व अनिल बागूल यांनी त्या महिलेला सूचना करीत सुरक्षितरीत्या बाहेर काढले. मात्र पडल्यामुळे त्यांना मुकामार लागला होता. या घटनेनंतर त्या प्रचंड घाबरल्या होत्या. पोलिसांनी वैद्यकीय मदतीबाबत विचारले असता त्यांनी एवढा मार लागला नसल्याचे सांगितले. तसेच गंगावणे कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.