रेल्वे इंजिनाला निकृष्ट पद्धत्तीची काच

0

एनआरएमयूचा आक्रमक पवित्रा ; अप्रिय घटना थांबविण्याची डीआरएम आर.के.यादव यांच्याकडे मागणी

भुसावळ– डाऊन 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजरच्या इंजिनावर अज्ञात मुलांनी केलेल्या दगडफेकीत सहचालक जखमी झाल्याची घटना शनिवारी चाळीसगावात घडली होती. या प्रकरणानंतर एनआरएमयूने आक्रमक पवित्रा घेत रेल्वेच्या इंजिनाला लावण्यात येणारी काच ही निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगत सेप्टी गार्डही तकलादू असल्याचे डीआरएम आर.के.यादव यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

सहचालक जखमी, एनआरएमयू आक्रमक
शनिवारच्या घटनेत मुंबई पॅसेंजरवरील सहचालक मंटू कुमार (29) हे जखमी झाले होते. एनआरएमयूने त्यांची भेट घेत आपबिती जाणून घेतली. कुमार यांच्यावर चाळीसगाव रुग्णालयात उपचार सुरू होते तर पवन एक्स्प्रेसने त्यांना सोमवारी रेल्वे रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर एनआरएमयू पदाधिकार्‍यांना डीआरएम यांना तातडीने रेल्वे रुग्णालयात बोलावून घेतले. डीआरएम यादव, सिनी.डीईई (टीआरओ) हे तातडीने रेल्वे रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी कुमार यांची भेट घेत घडल्या प्रकाराची माहिती जाणली. प्रसंगी एनआरएमयूचे मंडल सचिव पुष्पेंद्र कापडे व मंडल अध्यक्ष इब्राहिम खान यांनी डीआरएम यांच्याशी संवाद साधला. रेल्वे इंजिनाला लावण्यात येणार्‍या काच निकृष्ट पद्धत्तीच्या आहेत शिवाय स्पेप्टी आरडीएसओ मान्यताप्राप्त नसल्याने अशा घटना भुसावळ विभागात वारंवार घडत असल्याने त्यास पायबंद घालण्याची मागणी करण्यात आली. तक्रारीची तातडीने दखल घेत कारवाई करण्याचे आश्‍वासन यादव यांनी उभय पदाधिकार्‍यांना दिले. प्रसंगी रनिंग स्टाफचे एनआरएमयु सचिव ए.टी.खंबायत व पदाधिकारी उपस्थित होते.