भुसावळ। शहरात रेल्वेच्या पीओएच, एमओएच, झेडटीसी या विभागांत हजारो कर्मचारी यात कार्यरत असून येथूनच रेल्वेचा संपुर्ण कारभार चालविता जातो. मात्र ज्या कर्मचार्यांच्या जीवावर हा संपुर्ण कारभार चालविला जातो. त्याच कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे रेल्वे प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना किंवा यंत्रणा करण्यात आलेली नसून यातून रेल्वे प्रशासन सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वेत एमओएच, पीओएच, सीएनडब्ल्यू, एसएनटी, कर्मशिअल, मॅकेनिकल, इंजिनिअरींग, अकाऊंट, गँगमन, टीआरडी, वॉटर सप्लाय, झेडटीसी प्रशिक्षण केंद्र असे विविध विभाग आहेत. या विभागात एकूण 10 हजार कर्मचारी काम करतात. या कर्मचार्यांमुळे रेल्वेचे सर्व कामकाज चालते मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही तरदूत दिसून येत नाही.
सुरक्षेविषयी तरतुद करण्यात यावी
आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचे रेल्वेचे यार्ड भुसावळ येथे आहे. त्यामुळे हजारो गाड्यांची वाहतुक येथून होते. तसेच शहराला लागून असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रात भुसावळ येथूनच लाखो टन कोळशाचे रॅक तसेच बाहेरुन पेट्रोल, डिझेल, ऑईल यांचे टँकर लोड येथूनच ये- जा करतात. त्यानुषंगाने उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे आगी सारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे प्रशासनास कोट्यावधी रुपयांचा निधी येतो मात्र तो निधी इतर कामांवर खर्च करण्यात येतो परंतु कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी यात तरतूद करण्यात येत नाही. अशा काही घटना घडल्यास रेल्वेला बाहेरुन मदत घ्यावी लागते.
फायर फोर्स पदभरती केली रद्द
येथील रेल्वे सुरक्षा दलातर्फे रेल्वेत सुरक्षेची कामे करण्यात येत असतात. 1995 पर्यंत फायर फोर्स या नावाने आगी सारख्या घटना रोखण्यासाठी वेगळे पथक होते. हे पथक आपत्कालीन घटनांवर कार्य करत होते. या पथकासाठी वेगळे कार्यालय देखील देण्यात आले होते. येथून त्यांचे कामकाज चालत होते. मात्र कालांतराने रेल्वेने ती पोस्ट आरपीएफ दलातून रद्द केली. व या कर्मचार्यांना आरपीएफ दलात समाविष्ठ करण्यात आले होते. यास 21 वर्ष उलटले तरी आतापर्यंत फायर फोर्स पदभरती करण्यात आलेली नाही. तेव्हापासून आगी सारख्या आपत्कालीन घटना रोखण्यासाठी येथे स्वतंत्र अग्नीशमन दलाचे पथक नाही. त्यामुळे अशा घटना उद्भवल्यास बाहेरुन नगरपालिका, आयुध निर्माणी व दीपनगर येथून मदत घ्यावी लागते. तसेच स्थानकावर आगीच्या घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीरोधक स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे.
खासदार खडसेंना दिला प्रस्ताव
यासंदर्भात गेल्या वर्षी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाच्या काही सदस्यांनी भुसावळ स्थानकावर भेटी देऊन प्रवाशांना मिळणार्या सोयी- सुविधेसह सुरक्षेची तपासणी केली. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी देखील वारंवार लागणार्या आगीच्या घटनांबद्दल प्रश्न उपस्थित करुन स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच यासंदर्भात एडीआरएम अरुणकुमार धार्मिक यांना विचारणा केली असता रेल्वेच्या विभागांमध्ये कार्यस्थळी फायर इक्स्टींगिशर्स बसविण्यात आले आहेत. मात्र आग आटोक्यात न आल्यास नगरपालिका किंवा आयुध निर्माणीकडून अग्नीशमक दलास पाचारण केले जाते. रेल्वेची स्वतंत्र यंत्रणेसंदर्भात प्रशासनातर्फे खासदार रक्षा खडसे यांना अग्नीरोधक यंत्रणेसंदर्भात प्रस्ताव देण्यात आला असल्याचे सांगितले.