रेल्वे कर्मचार्‍याचा खून प्रकरणी भुसावळातील आरोपींची ओळख परेड

0
भुसावळ- शहरातील सोमनाथ मंदिर परीसरातील चांदमारी चाळीतील रहिवासी व रेल्वे कर्मचारी मो.सलीम इसराईल खान (57) यांचा जुन्या भांडणाच्या कारणातून दुचाकीवरून आलेल्या तिघा आरोपींनी गुरुवारी रात्री खून केला होता. या प्रकरणी भाजपाच्या नगरसेवक पूत्रासह अन्य दोघांना शहर पोलिसांनी अटक केली होती. आरोपींची ओळख परेड बाकी असल्याने त्यांची नावे उघड करण्यास पोलीस सूत्रांनी नकार दिला होता. मंगळवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात तिघा आरोपींची ओळख परेड करण्यात आली. नायब तहसीलदार सतीश निकम यांच्यासह सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले तसेच पंच व पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत आरोपींची ओळख परेड करण्यात आली. प्रत्यक्षदर्शीने आरोपींना ओळखले वा नाही याबाबतचा गोपनीय अहवाल बुधवारी शहर पोलिसांना प्राप्त होणार असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.
या आरोपींनी केला खून
खून प्रकरणी प्रेमसागर रवींद्र खरात, भारत दिलीप वाकेकर  (हद्दीवाली चाळ)  राहुल धम्मपाल सुरवाडे (लाल जैन मंदिर, भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रेमसागर हा भुसावळ भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात यांचा मुलगा आहे.  तीनही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी खुनाच्या दिवशीच वस्तरा घटनास्थळावरून जप्त केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.