रेल्वे खासगीकरणाच्या विरोधात चिंचवड प्रवासी संघ जाणार उच्च न्यायालयात

0

पिंपरी चिंचवड – रेल्वेचे नियोजित खासगीकरण, पुणे – लोणावळा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, प्रवाशांची सुरक्षा या मुद्द्यावर स्वाक्षरी मोहीम घेऊन आता चिंचवड प्रवासी संघ उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भालदार यांनी म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला, हा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न न करता मूठभर धनाढ्य भांडवलदाराच्या हातात रेल्वे देऊन 160 गाड्यांचे खासगीकरण करणे हा सर्वसामान्य जनतेसाठी घातक निर्णय आहे.

निगडी- पुणे दरम्यान दररोज पीएमपीएमएलने 90 हजार प्रवासी प्रवास करतात. रिक्षाने निगडी ते दापोडीदरम्यान दररोज 40 ते 45 हजार प्रवासी चढ-उतार करतात. अपुर्‍या रेल्वेच्या फेर्‍यांमुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होते. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गचे चौपदरीकरण करावे तसेच या कामात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांनी एकत्र मिळून प्रयत्न करायला हवेत अशी भूमिका प्रवासी संघाने मांडली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणार्‍या सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचा कोणीही विचार करत नाही. प्रवाशांच्या स्वाक्षर्‍या घेऊन अंतिम लढा उच्च न्यायालयात लढण्याचा इशारा चिंचवड प्रवासी संघाने दिला आहे.