रेल्वे चालकाच्या सतर्कतेने वर्धा पॅसेंजरचा अपघात टळला

0

वरणगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे रूळांवर अज्ञातांनी टाकले दगड : तत्काळ ब्रेक मारल्याने प्राणहानी टळली

वरणगाव- वरणगाव रेल्वे स्थानकापासून भुसावळकडे चार किमी अंतरावर अप व डाऊन रेल्वे रुळावर घातघात घडवण्याच्या दृष्टीने अज्ञातानी दगड व गिट्टी आणून टाकल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा पॅसेंजरच्या सतर्क लोकोपायलटला याबाबत कल्पना आल्यानंतर त्यांनी तत्काळ ब्रेक मारल्याने संभाव्य हानी टळली तर या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानख अचानक रेल्वे इंजिनाचे ब्रेक लावल्याने इंजिनचे कॅटल गार्डदेखील तुटल्याचे सांगण्यात आले.

वर्धा पॅसेंजरचा टळला अपघात
बुधवारी दुपारी 2.46 वाजेच्या सुमारास भुसावळ येथून वर्धाकडे जाणारी रेल्वे गाडी 51197 वरील प्रमुख चालक जी.एस.सहाना यांनी वरणगाव स्टेशन मास्तरांना डाऊन रेल्वे रुळावर खांबा क्रमांक 454/28 ते 30 वर एक मोठा दगड व प्लॅस्टीक गोणीमध्ये गिट्टी भरून ठेवल्याची माहिती कळवली तर अपघात टाळण्यासाठी ईमजन्सी ब्रेक लावल्याने रेल्वे रूळावरील दगडामुळे इंजिन क्रमांक 21950 / के.वाय.एनचे कॅटल गार्ड तुटले. या प्रकारानंतर गाडी किलोमीटर नंबर 455/01 डाऊन लाईनवर थांबवण्यात आली. ड्युटी इंचार्ज सुबोध कुमार यांनी घटनेबाबत तपासणीचे आदेश दिल्यानंतर निरीक्षक नवीन कुमार, लोकोचे एम.जे.रावत, निरीक्षक आर.एस.बनकर आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. डाउन रेल्वे लाईनवर एक दगड व गिट्टीने भरलेली गोणी फाटलेल्या अवस्थेत दिसली तसेच अप लाईनवर खांब क्रंमाक 454 / 29 , 455/2 मधील रुळावर एका गोणीवर दुसरी गोणी ठेवलेली दिसली.

वरणगाव पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा
डाऊन रेल्वे लाईनवर कोणीतरी अज्ञातांनी एक दगड व गिट्टीने भरलेली गोणी रेल्वे रुळावर ठेवून रेल्वे गाडीच्या इंजिनाचे कॅटल गार्डचे नुकसान केल्याप्रकरणी रेल्वेचे वरणगावचे वरीष्ठ अभियंता ब्रिजमोहन कैलास प्रसाद यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक जितेंद्र वासनकर, वरणगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी.के.पठाण , उसरे, हवालदार प्रवीण बर्‍हाटे, रोशन सिंग, बाबा चौधरी, हवालदार संदीप बळगे तपास करीत आहेत.