रेल्वे डब्यात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

0
पिंपरी : मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस रेल्वेच्या महिला डब्यामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस या रेल्वेमध्ये महिला डब्यात एका महिलेला रक्ताच्या उलट्या झाल्या. ही बाब डब्यातील महिलांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पुढील रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच रेल्वे गार्डच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार रेल्वे गार्ड आणि चालक यांनी पिंपरी पोलिसांना ही खबर दिली. पिंपरी रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या महिला डब्यातून संबंधित महिलेला सायंकाळी साडेचारच्या सुमारास खाली उतरवून घेतले. तिला तात्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मृत्यू झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. रंग गोरा, चेहरा गोल, उंची चार फूट तीन इंच, अंगाने सडपातळ, पांढरा फुल शर्ट आणि पिवळा लेहंगा असे तिचे वर्णन असून संबधित महिलेविषयी माहिती मिळाल्यास पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.