रेल्वे तिकीटे ब्लॅकने विकणारा संशयीत रेल्वे सुरक्षा बलाच्या जाळ्यात

0

भुसावळ- रेल्वे स्थानकावर आरक्षण कार्यालयाबाहेर ब्लॅकने आरक्षित तिकीटांची विक्री करणार्‍या संशयीतास रेल्वे सुरक्षा बल व रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या पथकाने अटक केल्याची घटना 19 रोजी घडली. या प्रकरणी साबीर शेख नासीर शेख (39, खडका रोड, लक्ष्मी मंदिरामागे, भुसावळ), यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून तीन हजार 940 रुपये किंमतीची भुसावळ ते मुंबई प्रवासाची दोन (तत्काळ) तर भुसावळ ते पुणे प्रवासाचे एक आरक्षित तिकीट जप्त करण्यात आले. शंभर ते दोनशे रुपये जादा किंमतीने हे तिकीटे प्रवाशांना विकत असल्याची कबुली संशयीताने दिली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना असलेली गर्दी व नो रूम पाहता आरक्षित तिकीटे ब्लॅकने विकली जात असल्याचा रेल्वे प्रशासनाला संशय असल्याने कारवाईबाबत डीआरएम आर.के.यादव यांनी निर्देश होते. 19 रोजी सकाळी 9.50 वाजेच्या सुमारास सीटीआय ए.एस.राजपूत, एच.डी.सावकारे, टीटीई प्रशांत ठाकुर व आरपीएफ कर्मचारी आर.के.यादव यांनी आरक्षण कार्यालयाबाहेरून साबीर शेख नासीर शेख यास ताब्यात घेतले. आरोपीच्या अंग झडतीत भुसावळ-मुंबई प्रवासाचे दोन तत्काळ तिकीट तसेच भुसावळ-पुणे प्रवासाचे एक आरक्षित तिकीट जप्त करण्यात आले. तिकीट काढण्याबाबत आरोपीकडे कुठलाही पुरावा आढळला नाही तसेच आरक्षणाचे कोरे फार्म आढळल्याने पथकाचा संशय बळावल्याने आरोपीने शंभर ते दोनशे जादा घेवून हे तिकीट रेल्वे प्रवाशांना विक्री केली जात असल्याची आरोपीने कबुली दिली. आरोपीविरुद्ध भुसावळ रेल्वे सुरक्षा बल ठाण्यात रेल्वे अ‍ॅक्ट 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.