रेल्वे पाठोपाठ, गॅस सिलिंडर दरात आजपासून वाढ

0

नवी दिल्ली: केंद्रसरकारने नववर्षाच्या पहिल्या दिवशी रेल्वे भाडे वाढ, तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. आज पासून दरवाढ झाली असून आता घरगुती गॅस साठी ७४९ रुपये मोजावे लागणार आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे .

घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. चलन विनिमय दरातील बदल इंधन आयातीच्या खर्चात वाढ करतात. २०१९ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात २.२८ टक्के अवमूल्यन झाले.

गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस ७४९ रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत २९.५० वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी १३२५रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून (बुधवार) लागू करण्यात येणार आहे.