रेल्वे पुलाच्या दुरूस्तीचे जनरेटर चोरले

0
जळगाव- शहरातील गिरणा पंपीगजवळील रेल्वे पुलाच्या दुरुस्ती ठिकाणावरून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे जनरेटर चोरून नेल्याची घटना दि.20 रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत ठेकेदाराच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील सुरेश बाबुलाल शर्मा हे रेल्वे पुल दुरुस्ती ठेकेदार असून सध्या त्यांचे गिरणा पंपीगजवळील रेल्वे पुलाच्या खांबा क्रमांक 415/11 जवळ दुरुस्तीचे काम सुरु आहे. याठिकाणी बांधकाम साहित्यासह जनरेटर ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी राजु रमण भुरे, किशोर देविदास कोळी व किशोर हिरामण कोळी या कर्मचार्‍यांसह इतर कर्मचारी कार्यरत होते.
19 रोजी लांबविले जनरेटर
दरम्यान, दि.19 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पुल दुरुस्ती ठिकाणी असलेले किलोस्कर कंपनीचे 7.5 केव्ही पॉवरचे 30 हजार रुपयांचे जनरेटर चोरून नेले. दुसर्‍या दिवशी दि.20 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत आज रेल्वे ठेकेदार सुरेश बाबुलाल शर्मा यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक योगेश वाघ करीत आहे.