तळेगाव स्टेशन । रेल्वे हद्दीतील अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरी ही त्यांनी अतिक्रमणे न हटविल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत ही अतिक्रमणे हटविली. रेल्वे अधिकारी, आरपीएफ देहुरोड, आरपीएफ तळेगाव, तसेच तळेगाव पोलिस स्टेशन यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. आरपीएफचे यादव, मुकेश व त्यांचे देहुरोड, तळेगावचे सहकारी तसेच तळेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी धिगावकर, पी.एन.मारणे, वाडेकर व सहकार्यांनी ही कारवाई केली.
वाहतुकीला अडथळा
रेल्वे पुलाजवळील पूर्व बाजूकडील तळेगाव, चाकण रस्त्याच्या दुतर्फा असणार्या टपर्या, हातगाड्या, मटण व चिकनचे दुकान, मागील बाजूस अवैध व्यवसाय, जमीनदोस्त करण्यात आली. या अतिक्रमणांचा वाहतुकीस मोठा अडथळा होता. त्यामुळे वाहतूक कोंडीही होत होती. अशीच कारवाई रेल्वे स्टेशन जवळील यशवंतनगर बाजूकडील अतिक्रमणांवर झाली, तर पोस्ट ऑफीस ते यशवंतनगर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व पादचार्यांची मोठी अडचण दूर होईल. अवैध वाहनतळ ही हटवावा, अशी नागरिक व रेल्वे प्रवाशांची मागणी आहे.