रेल्वे प्रमोटी अधिकार्‍यांवर अन्याय; डीआरएम यांच्याकडे मांडल्या व्यथा

0

भुसावळ– ज्युनिअर प्रशासकीय ग्रेड पदावर ‘पदोन्नती‘ मिळालेल्या प्रमोटी अधिकार्‍यांना पदावनत करीत पुन्हा सिनीअर स्केल ग्रेड देण्याचा अन्यायकारक निर्णय रेल्वे बोर्डाने घेत 6 रोजी परीपत्रक जारी केल्यानंतर रेल्वेतील प्रमोटी अधिकार्‍यांनी अन्यायकारक निर्णयाच्याविरोधात संताप व्यक्त करीत बुधवारी डीआरएम आर.के.यादव यांच्याकडे व्यथा मांडल्या. अन्याय थांबवण्याची मागणी प्रसंगी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. रेल्वे बोर्डाने हा निर्णय पटना कॅट बेंचच्या निर्णयाच्या संदर्भात घेतला आहे. यामुळे भुसावळ डिव्हीजनमध्ये कार्यरत सर्व प्रमोटी ऑफिसर्समध्ये निराशेचे वातावरण असून त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. रेल्वे बोर्डाचा हा निर्णय युपीएससीतून सिलेक्ट होणार्‍या ग्रुप ए अधिकार्‍यांच्या फायद्याचा असून निर्णय घेणारे रेल्वे बोर्डातील अधिकारीसुध्दा ग्रुप ए दर्जाचे आहेत. या निर्णयामुळे प्रमोटी ऑफिसर्सचे मानसिक खच्चीकरण झाले असून मनोबल सुध्दा ढासळले आहे. हा निर्णय मागे घेण्याच्या संदर्भात भुसावळ डिव्हीजनच्या प्रमोटी ऑफिसर्स असोसिएशनतर्फे निवेदन डीआरएम आर.के.यादव यांना देण्यात आले. या निवेदनात प्रमोटी ऑफिसर्सची डीपीसी नियमित वेळेत करणे, गेल्या दोन वर्षात झालेल्या डीपीसीनुसार प्रमोशन करणे तसेच डायरेक्ट ऑफिसर्स व प्रमोटी ऑफिसर्स यातील भेदभाव दूर करून त्यांच्यावर होत असणारा अन्याय थांबवणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष एन.के.अग्रवाल, सचिव जी.आर.अय्यर व इतर अनेक प्रमोटी अधिकारी उपस्थित होते.