भुसावळ- उन्हाळी सुट्यानंतरही रेल्वे गाड्यांना असणारी गर्दी पाहता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाच हॉलिडे स्पेशल गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यात जबलपूर-पुणे, जबलपूर-कोईमतूर, हबीबगंज-धारवार, जबलपूर-सिकंदराबाद आणि झेडआरटीआय जवळील कॉडलाईनवरून जाणारी हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन स्थानकावरून देशातील सर्व भागात जाण्यासाठी रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणार्या बहुतांश सर्व गाड्यांमध्ये गर्दी कायम आहे. अद्यापही अनेक रेल्वे गाड्यांचे कनफर्म आरक्षण मिळत नसल्याने प्रतीक्षा यादी वाढली आहे. त्यामुळे वेटींग तिकीट असलेल्या प्रवाशांना आरक्षण डब्यात जागा नसल्यामुळे खाली बसून प्रवास करावा लागतो. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने रेल्वे प्रशासनाने पाच साप्ताहिक गाड्यांना मुदतवाढ दिली आहे.
या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
भुसावळ विभागातून धावणार्या गाड्यांमध्ये जबलपूर-पुणे गाडीला 30 सप्टेंबरपर्यंत, जबलपूर कोईमतूर या गाडीला 29 सप्टेंबरपर्यंत, हबीबगंज-धारवार 28 सप्टेंबर, जबलपूर सिकंदराबाद एस्क्स्प्रेस 24 सप्टेबर, तर कॉडलाईनवरून जाणारी हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, झेडआरटीआयपासून कॉडलाईनवरून जाणारी हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला भुसावळ जंक्शनवर थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. भुसावळ येथून हैद्राबाद व जयपूरला जाणारी थेट गाडी असूनही त्याचा भुसावळातील प्रवाशांना उपयोग होत नाही. त्यामुळे कॉडलाईनवरून जाणार्या या गाडीला झेडआरटीआयजवळ प्लॅटफॉर्म तयार करून दोन मिनिटांसाठी थांबा द्यावा, अशी मागणी होत आहे.