गर्दीच्या हंगामात चाकरमान्यांचे अतोनाल हाल ; भादलीदरम्यान नॉन इंटर लॉकिंगचे काम
भुसावळ- उन्हाळी सुट्यांसोबत लग्नसराईच्या हंगामातच रेल्वेने पॅसेंजर गाड्या बंद ठेवल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. 1 एप्रिलपासून पॅसेंजर सुरू होण्याची शक्यता असतानाच भुसावळ विभागातील भुसावळ-भादली सेक्शन दरम्यान नवीन तिसर्या रेल्वे लाईनीच्या कामासह नॉन इंटर लॉकिंगच्या कामासाठी रेल्वेने तांत्रिक ब्लॉक घेतल्याने पुन्हा 23 एप्रिलपर्यंत मुंबई व सुरत पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या संतापात अधिक भर पडली आहे. अल्प भाड्यात इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवाशांची पॅसेंजरला पसंती असलीतरी सातत्याने पॅसेंजरच रद्द केली जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रवासी संतप्त झाले आहेत.
23 एप्रिलनंतर धावणार पॅसेंजर
भुसावळ जंक्शनवरून सुटणार्या मुंबई, देवळाली, सूरत (दोन गाड्या) व नागपूर या पॅसेंजर गाड्या 15 मार्चपासून बंद असल्यातरी त्या 1 एप्रिलपासून सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन होते शिवाय भुसावळ दौर्यावर आलेले जी.एम.डी.के.शर्मा यांनीही प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता गर्दीच्या हंगामात पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचे आश्वासन दिले मात्र तेदेखील फोल ठरले आहे. आता रेल्वेने 23 एप्रिलनंतर या गाड्या पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिनाभरापासून रेल्वे प्रवाशांना मनस्ताप
मुंबई, देवळाली, नागपूर तसेच सकाळी व रात्री सुटणारी सूरत पॅसेंजर या पाच गाड्या 15 फेब्रुवारीपासून मेंटेनन्सच्या कामांसाठी रेल्वेने रद्द केल्या होत्या तर 1 एप्रिलपासून या गाड्यांची सेवा पूर्ववतहोण्याची अपेक्षा फोल ठरली. तब्बल दिड महिन्यांपासून भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना या गाड्या सुरू होण्याची अपेक्षा असलीतरी गाड्या सुरू होत नसल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनाल होत असून त्यांना एक्स्प्रेस गाड्यांसह बसेसने प्रवास करावा लागत असल्याने वेळेसह पैशांचा मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा आणि ऐन लग्नसराईत पॅसेंजर गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
23 एप्रिलनंतर रेल्वे प्रवाशांना दिलासा
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक अप 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 1 ते 23 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली तर गाडी क्रमांक 51153 डाऊन मुंबई ई भुसावळ पॅसेंजरदेखील 1 ते 23 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली. गाड़ी क्रमांक 59076 अप भुसावळ-सुरत आणि डाऊन 59075 सुरत-भुसावळ पॅसेंजर व 59078 अप आणि 59077 डाऊन भुसावळ-सुरत पॅसेंजरदेखील 1 ते 23 एप्रिलदरम्यान रद्द करण्यात आली आहे.
देवळालीसह नागपूर पॅसेंजरचा दिलासा
तांत्रिक कामांमुळे रद्द झालेल्या अप-डाऊन भुसावळ-देवळाली व भुसावळ-नागपूर पॅसेंजर मात्र सोमवार, 1 एप्रिलपासून नियमित धावणार आहे. डाऊन 51181 देवळाली-भुसावळ व अप 51182 भुसावळ-देवळाली पॅसेंजर तसेच 51285 भुसावळ-नागपूर व 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर मात्र नेहमीच्या वेळेनुसार 1 एप्रिलपासून धावणार असल्याने या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.