रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : खंडवासह देवळाली, बडनेरा दरम्यान मेमू धावणार !

ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात मेमू गाडी धावण्याची दाट शक्यता

भुसावळ : तब्बल 19 महिन्यांपासून कोरोनामुळे पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे मात्र प्रवाशांना मोठी दिलासा देणारी बातमी असून पुढील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भुसावळ येथून खंडवा, बडनेरा व देवळाली दरम्यान मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसाधारण प्रवासी वर्गासह अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, वरील मार्गावर पॅसेंजरऐवजी मेमू चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

जीएम कार्यालयाने घेतली माहिती
भुसावळातून नेमक्या किती गाड्या धावतात, त्याबाबत असलेले प्रवासी डबे आदींची माहिती काही दिवसांपूर्वीच जीएम कार्यालयाने मागविली होती. यात भुसावळ येथून सुटणारी मुंबई पॅसेजर, देवळाली शटल, अमरावती, कटनी, इटारसी, वर्धा, नागपूर पॅसेजर या गाड्यांची माहिती देण्यात आली. सर्वच पॅसेजर गाड्या बंद करून त्या जागी मेमू गाडी चालविण्याचा रेल्वेचा विचार असून त्याबाबत रेल्वे प्रशासन लवकरच अधिकृतरीत्या निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

पॅसेंजर ऐवजी धावणार मेमू गाड्या
भुसावळ येथून ऑक्टोंबर महिन्यात तीन पॅसेजर गाड्यांची जागा मेमू गाडी घेणार आहे. यात भुसावळ येथून भुसावळ-खंडवा, भुसावळ-देवळाली आणि भुसावळ-बडनेरा या तीन मेमू गाड्या तीन मार्गावर चालविल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भुसावळ विभागातच या गाड्या चालविण्याचे नियोजन असलेतरी कटनी, मुंबई पॅसेजर या गाड्यांना पुन्हा बंदचा फटका बसण्याची भीती आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाची मेमू गाड्यांबाबत अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी डीआरएम एस.एस.केडीया यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.