भुसावळ : सुटी मागणार्या रेल्वे लोकोपायलटशी असभ्य भाषा वापरणार्या भुसावळ आणि नांदगाव येथील लोको फोरमन यांची प्रचंड दादागिरी थांबवून त्यांची तातडीने उचलबांगडी करण्याच्या मागणीसाठी संतप्त लोकोपायलटांनी भुसावळ डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाशी चर्चा केली. नांदगाव आणि भुसावळ येथील लोको फोरमनची आठवडाभरात बदली केली नाही तर 27 डिसेंबरला भुसावळ येथे येत असलेल्या मध्य रेल्वेच्या जीएम यांना लोको पायलट त्यांच्या परिवारासह काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा लोको पायलट संघटनेच्या पदाधिकार्यांनी गुरूवारी रेल्वेच्या अधिकार्यांना दिला.
अर्वाच्च भाषेनंतर लोको पायलटचा आत्महत्येचा प्रयत्न
भुसावळ विभागातील नांदगाव येथे लोको पायलट डेपोतील लोको फोरमन जी.व्ही.गोरे यांच्याकडे मालगाडीवरील चालक संजय ठाकूर यांनी सुटी मागितल्यानंतर गोरे यांनी त्यांना सुटी तर दिलीच नाही मात्र अर्वाच्च भाषेत तुम्हाला तुमच्या कुटुंबांच्या कामात येऊ देणार नाही, तुम्ही काम कसे करतात ते पाहतो असे म्हणत अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर ठाकूर यांनी नांदगाव येथेच रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रूळावर झोपताच अनेक रेल्वे कर्मचार्यांनी धाव घेत ठाकूर यांची समजूत काढत त्यांना रेल्वे रूळावरून उठविले. भुसावळ विभागातील लोको पायलट यांना ही माहिती मिळताच त्यांच्यातून संताप व्यक्त करण्यात आला. ऑल इंडीया लोको पायलट असोशिएशनने याची गंभीर दखल घेत गुरूवारी दुपारी 4.30 वाजता असोशिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी डीआरएम कार्यालय गाठले. यावेळी सहा.मंडळ अभियंता सौरभ गोयल यांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला. रेल्वे म्हणते तणावमुक्त काम करा मात्र रेल्वेचेच अधिकारी हे उद्दाम भाषेत बोलतात त्यामुळे तणावमुक्त काम कसे करणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी असोशिएशनचे झोनल अध्यक्ष एस.आर. मोरे, मंडळ सचीव एस.एन. बोकाडे, सीडब्ल्यूसी कमिटीचे सदस्य के.के.रावत यांच्यासह अनेक लोको पायलट उपस्थित होते.