अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन अलर्ट : रेल्वे रूळापासून नागरीकांनी रहावे दूर
भुसावळ- पंजाबमधील अमृतसर येथे रावण दहन कार्यक्रमप्रसंगी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे प्रशासन अलर्ट झाले असून अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरीकांनी रेल्वे रूळापासून लांब रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील आऊट असो वा कॉसमॉस बँकेच्या परीसर तसेच झेडटीएस गेट भागात अनेकदा नागरीक बाहेर पडण्यासाठी शॉर्टकटचा वापर करतात त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोक लवकर कार्यालय, रेल्वे स्थानक किंवा घरी जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग अवलंबून रेल्वे रुळ ओलांडून जातात हे धोकादायक आहे. यामुळे जीवित किंवा वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे स्थानकावर येण्या-जाण्यासाठी रेल्वे रूळांचा वापर न करता स्वयंचलित जीने, पुल व लिफ्टचा वापर करावा अन्यथा रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे अधिनियम कलम 147 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. रेल्वे मैदान किंवा रेल्वे रुळाजवळ आयोजित करण्यात येणार्या कुठल्याही कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासन व रेल्वे विभागाची परवानगी घेणे आवश्यक असून परवानगीशिवाय कार्यक्रमाचे आयोजन केल्यास किंवा दुर्घटना घडल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे भुसावळ रेल्वे विभागाने कळविले आहे.